महाराष्ट्रातल्या मराठी मनावर घट्ट पकड असलेल्या ठाकरे परिवारातील कुणाशीही गप्पा मारतांना मजा येते. बोलतांना हातचं राखून काहीही नसतं. बोलून झाल्यावर, ’मी असं बोललोच नाही’, असं म्हणून आम्हाला तोंडघशी पाडणं नसतं. आवाजाला एक दमदार नाद असतो. शब्दांचे खटके असतात.
उद्धवजी आणि राज हे दोघेही महाविद्यालयीन काळात होते, तेव्हा मी मुंबई दूरदर्शनवर ’आमची पंचविशी’ या कार्यक्रमात बाळासाहेबांशी प्रथम जाहीर संवाद साधला होता. तेव्हा ते ’मातोश्री’वरून थेट दूरदर्शन स्टुडिओत येत असत. तेव्हापासून सुरू झालेल्या मुक्त गप्पा, तीस वर्षांहूनही अधिक काळ, आजही कायम आहेत. गतवर्षीच निवडणूक काळात, साहेबांच्या सतत तीन मुलाखती गाजल्या. अगदी महिन्याभरापूर्वी, माझ्या ’साठी’निमित्त, माझ्यावरचीच टिपण्णी ’साहेब’ करणार होते.
"’साठी’चे सत्कार वगैरे काय करायचेत ते करा. पण उगीच ’साठी’त पोहोचल्याच्या थापा मारू नका", अशी खट्याळ टिपण्णी करत भरभरून बोलले. प्रेमानं आशीर्वाद दिला. उद्धवजींनीही ’सुधीरजी आमच्या घरचेच आहेत’ असं म्हणत शुभेच्छा दिल्या. पण तत्पूर्वी मागच्या फ़ेब्रुवारीत मराठी दिनाला उद्धवजींनी बाळासाहेबांच्या सहीचं मोठ्ठं मानपत्र देऊन बोरीवलीत भव्य सत्कारही केला होता. त्यांच्याशी माझ्या ख-या गप्पा रंगल्या, त्या गतवर्षी अमेरिकेतल्या अधिवेशनाच्या वेळी! (उद्धवजींबद्दल याच ब्लॉगमध्ये सविस्तर लिहीन.)
आत्ता ठाकरे परिवाराच्या शब्दछटांची आठवण येण्याचं कारण म्हणजे आत्ताच माझ्या हाती पडलेलं एक दुर्मिळ कार्टून! राज ठाकरेंनी खुद्द माझच काढलेलं! फ़ारा दिवसांनी स्केच पेन हाती घेऊन तीन-साडेतीन हजार प्रेक्षकांच्या समोर, माझ्या पुढ्यात, माझ्याच चेह-याचे, समोरच्या कागदावर अवघ्या तीन मिनीटात ’स्ट्रोक’ मारले.
मला एकदम सत्ताविस-अठ्ठाविस वर्षांपूर्वी पार्ल्याच्या ’लोकमान्य सेवा संघा’च्या मैदानावर राज ठाकरेंशी केलेला पहिला प्रकट संवाद आठवला. त्यावेळी त्यांच्याबरोबर ’पपा’, म्हणजे श्रीकांत ठाकरेही होते. ’वलयांकित पिता-पुत्र’ हे माझ्या गप्पांचं सूत्र होतं. राजना बोलण्याचं टेन्शन होतं. परवा माझं कार्टून काढण्यापूर्वी त्यांनी मनमोकळेपणे सांगितलंही, की, मी स्टेजवर बोलणं सुरु करेपर्यंत टेन्शनमध्ये असतो. पण एकदा तोंड उघडलं की...., पुढचं आपण अनुभवतोच. मी अनेकदा ’राज’मैफ़लीत सहभागी झालोय. त्यांच्या पुण्याच्या घरी आणि पूर्वी समारंभस्थळी.
’झेंडा’ सिनेमावर वादंग सुरु होता. त्यावेळी मी राजना विचारलं, " ’झेंडा’वर प्रतिक्रिया काय?"
"प्रतिक्रिया काय? मी काय गेंडा आहे कशावरही प्रतिक्रिया द्यायला?" खाट्कन उत्तर आलं.
गप्पा मारायला, सिनेमे पहायला, चवीनं मोजकंच खायला, ड्रायव्हिंग करायला त्यांना मनापासून आवडतं. फ़्लोरोसंट हायलायटरने हायलाईट करत वाचत असल्याचं मला आठवतंय. त्यावेळी ते ’सिंगापूर स्टोरी’ वाचत होते. टिळकांचे अग्रलेख, कुरूंदकर, अत्रे, गांधी असं वाचयचीही ’सवय’ लावून घेतली आहे. गाडीत सतत गाणं असतं. आर.डी.बर्मनवर प्रेम. अलिकडच्यापैकी अजय-अतुलच्या रचना आवडतात. जॉन हॉर्वर आणि जॉन विल्यम्स यांच्यासरख्या बॆकग्राऊंड स्कोअरवाल्यांचे बारकावे माहीत.
सकाळी २-४ कप चहा पीत सर्व वर्तमानपत्रं बारकाईनं वाचतात. इंटरनेट, गूगल, यू ट्यूब या सर्व माध्यमातून अपडेट राहतात. वाचलेल्या पुस्तकात चिठ्ठ्या, खूणा असतात, संदर्भ चट्कन कळावेत म्हणून! रोज एक सिनेमा तर किमान बघतातच. ’गांधी’ सिनेमा शंभरहून अधिक वेळा पाह्यलाय. ’गांधीं’चं ब्रिटिश लेखकानं लिहिलेलं चरित्र मागच्या दिवाळीला राजनं मित्रांना भेट म्हणून पाठवलं. परदेशी मंडळी व्यक्तीचं प्रोजेक्शन फ़ार नेमकं करतात, हे वाचतांना अनुभवावं, हा या भेटीमागचा हेतू. स्वत:ला ऎनिमेशन फ़िल्म करण्यात जबरदस्त रस होता. पण फ़िल्म्स, कार्टूनसाठी वेळ द्यायला ’मनसे’च्या राजसाहेबांना वेळच मिळत नाही.
आपली यूल ब्रायनर सारखी चाल, चष्मा सावरणं, आवाजाचा नाद, हे सारं समोरच्यांना आवडतं, याचं भान आहे. गबाळेपणाचा मूळातच राग आहे. त्यामुळे प्रचाराच्या पोस्टर्सवरही वेगवेगळ्या कपड्यातली नेटकी ’राज’ छबी असते. जॉर्ज फ़र्नांडिस, श्रीपाद अमृत डांगे आणि सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे-अटलबिहारी वाजपेयी यांचं वक्तृत्व आवडलेलं!
"जनतेच्या नाडीचा अंदाज कधी येतो?
"मतमोजणीच्या वेळी मतं फ़ुटल्यावर."
शब्दांचे फ़ुटाणे असे फ़ुटतात. समोरची गर्दी वाढतच जाते. मात्र खुद्द राजला जंगलातल्या एकाकी टूरिस्ट हॊटेलवर शांतपणे पुस्तक वाचत बसायला फ़ार आवडतं. सतत गर्दीतला माणूस, असा मनातून गर्दीपासून दूर असतो.
gardi madhe rahnara manus gardhi sarkhach wagaila lagto, garditna baher padun jo tyach gardi cha abhyaas va trasanche nirmulan karto.....toch 'Raja' tharto! :)
ReplyDeleteGr8. I am happy that I was a part of the show of which photo u have displayed above. I have organized this have managed the show at Siddhi Garden. D u remember. Sagar
ReplyDeleteEk Number lekh ahe...Im glad that I came to know some hidden facts about Raj Saheb...I wish, one day, I could write something similar about him...Jai Maharashtra!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete