Thursday, January 20, 2011

राज

महाराष्ट्रातल्या मराठी मनावर घट्ट पकड असलेल्या ठाकरे परिवारातील कुणाशीही गप्पा मारतांना मजा येते. बोलतांना हातचं राखून काहीही नसतं. बोलून झाल्यावर,मी असं बोललोच नाही’, असं म्हणून आम्हाला तोंडघशी पाडणं नसतं. आवाजाला एक दमदार नाद असतो. शब्दांचे खटके असतात.

उद्धवजी आणि राज हे दोघेही महाविद्यालयीन काळात होते, तेव्हा मी मुंबई दूरदर्शनवर आमची पंचविशीया कार्यक्रमात बाळासाहेबांशी प्रथम जाहीर संवाद साधला होता. तेव्हा ते मातोश्रीवरून थेट दूरदर्शन स्टुडिओत येत असत. तेव्हापासून सुरू झालेल्या मुक्त गप्पा, तीस वर्षांहूनही अधिक काळ, आजही कायम आहेत. गतवर्षीच निवडणूक काळात, साहेबांच्या सतत तीन मुलाखती गाजल्या. अगदी महिन्याभरापूर्वी, माझ्या साठीनिमित्त, माझ्यावरचीच टिपण्णी साहेबकरणार होते.


"’साठीचे सत्कार वगैरे काय करायचेत ते करा. पण उगीच साठीत पोहोचल्याच्या थापा मारू नका", अशी खट्याळ टिपण्णी करत भरभरून बोलले. प्रेमानं आशीर्वाद दिला. उद्धवजींनीही सुधीरजी आमच्या घरचेच आहेतअसं म्हणत शुभेच्छा दिल्या. पण तत्पूर्वी मागच्या फ़ेब्रुवारीत मराठी दिनाला उद्धवजींनी बाळासाहेबांच्या सहीचं मोठ्ठं मानपत्र देऊन बोरीवलीत भव्य सत्कारही केला होता. त्यांच्याशी माझ्या ख-या गप्पा रंगल्या, त्या गतवर्षी अमेरिकेतल्या अधिवेशनाच्या वेळी! (उद्धवजींबद्दल याच ब्लॉगमध्ये सविस्तर लिहीन.)


आत्ता ठाकरे परिवाराच्या शब्दछटांची आठवण येण्याचं कारण म्हणजे आत्ताच माझ्या हाती पडलेलं एक दुर्मिळ कार्टून! राज ठाकरेंनी खुद्द माझच काढलेलं! फ़ारा दिवसांनी स्केच पेन हाती घेऊन तीन-साडेतीन हजार प्रेक्षकांच्या समोर, माझ्या पुढ्यात, माझ्याच चेह-याचे, समोरच्या कागदावर अवघ्या तीन मिनीटात स्ट्रोकमारले.
मला एकदम सत्ताविस-अठ्ठाविस वर्षांपूर्वी पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या मैदानावर राज ठाकरेंशी केलेला पहिला प्रकट संवाद आठवला. त्यावेळी त्यांच्याबरोबर पपा’, म्हणजे श्रीकांत ठाकरेही होते. ’वलयांकित पिता-पुत्रहे माझ्या गप्पांचं सूत्र होतं. राजना बोलण्याचं टेन्शन होतं. परवा माझं कार्टून काढण्यापूर्वी त्यांनी मनमोकळेपणे सांगितलंही, की, मी स्टेजवर बोलणं सुरु करेपर्यंत टेन्शनमध्ये असतो. पण एकदा तोंड उघडलं की...., पुढचं आपण अनुभवतोच. मी अनेकदा राजमैफ़लीत सहभागी झालोय. त्यांच्या पुण्याच्या घरी आणि पूर्वी समारंभस्थळी.


झेंडासिनेमावर वादंग सुरु होता. त्यावेळी मी राजना विचारलं, " ’झेंडावर प्रतिक्रिया काय?"

"प्रतिक्रिया काय? मी काय गेंडा आहे कशावरही प्रतिक्रिया द्यायला?" खाट्कन उत्तर आलं.


गप्पा मारायला, सिनेमे पहायला, चवीनं मोजकंच खायला, ड्रायव्हिंग करायला त्यांना मनापासून आवडतं. फ़्लोरोसंट हायलायटरने हायलाईट करत वाचत असल्याचं मला आठवतंय. त्यावेळी ते सिंगापूर स्टोरीवाचत होते. टिळकांचे अग्रलेख, कुरूंदकर, अत्रे, गांधी असं वाचयचीही सवयलावून घेतली आहे. गाडीत सतत गाणं असतं. आर.डी.बर्मनवर प्रेम. अलिकडच्यापैकी अजय-अतुलच्या रचना आवडतात. जॉन हॉर्वर आणि जॉन विल्यम्स यांच्यासरख्या बॆकग्राऊंड स्कोअरवाल्यांचे बारकावे माहीत.


सकाळी २-४ कप चहा पीत सर्व वर्तमानपत्रं बारकाईनं वाचतात. इंटरनेट, गूगल, यू ट्यूब या सर्व माध्यमातून अपडेट राहतात. वाचलेल्या पुस्तकात चिठ्ठ्या, खूणा असतात, संदर्भ चट्कन कळावेत म्हणून! रोज एक सिनेमा तर किमान बघतातच. ’गांधीसिनेमा शंभरहून अधिक वेळा पाह्यलाय. ’गांधींचं ब्रिटिश लेखकानं लिहिलेलं चरित्र मागच्या दिवाळीला राजनं मित्रांना भेट म्हणून पाठवलं. परदेशी मंडळी व्यक्तीचं प्रोजेक्शन फ़ार नेमकं करतात, हे वाचतांना अनुभवावं, हा या भेटीमागचा हेतू. स्वत:ला ऎनिमेशन फ़िल्म करण्यात जबरदस्त रस होता. पण फ़िल्म्स, कार्टूनसाठी वेळ द्यायला मनसेच्या राजसाहेबांना वेळच मिळत नाही.


आपली यूल ब्रायनर सारखी चाल, चष्मा सावरणं, आवाजाचा नाद, हे सारं समोरच्यांना आवडतं, याचं भान आहे. गबाळेपणाचा मूळातच राग आहे. त्यामुळे प्रचाराच्या पोस्टर्सवरही वेगवेगळ्या कपड्यातली नेटकी राजछबी असते. जॉर्ज फ़र्नांडिस, श्रीपाद अमृत डांगे आणि सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे-अटलबिहारी वाजपेयी यांचं वक्तृत्व आवडलेलं!


"जनतेच्या नाडीचा अंदाज कधी येतो?

"मतमोजणीच्या वेळी मतं फ़ुटल्यावर."


शब्दांचे फ़ुटाणे असे फ़ुटतात. समोरची गर्दी वाढतच जाते. मात्र खुद्द राजला जंगलातल्या एकाकी टूरिस्ट हॊटेलवर शांतपणे पुस्तक वाचत बसायला फ़ार आवडतं. सतत गर्दीतला माणूस, असा मनातून गर्दीपासून दूर असतो.

Sunday, December 5, 2010

एका अवलियाचा अस्त

पुण्याच्या भरत नाट्य मंदीर जवळच्या पवनमारूती चौकात, टीचभर दुकानात, गेली साठ वर्षं वर्तमानपत्र विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टाला भलामोठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीला अडकवण्यासाठी 'घोडा'. चेह-यावर ऊन येतंय असं वाटून त्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. थेट स्पष्ट पुणेरी बोलणं. पेपर विकणारे हे ’बाबूराव’ थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी उलटल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील ,यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण ’शतकाचे साक्षी’ असलेल्या बाबूरावांच्या या अचाट उद्योगांचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अतर्क्य वाटाव्या अशा अफ़ाट गोष्टी करणारा हा ’अवलिया, परवा, वयाच्या १०३ व्या वर्षी निवर्तला.जन्मभर बाईंडिंग आणि वृत्तपत्रविक्रीत रमलेल्या बाबुरावांना खाण्याचा, पळण्याचा, चालण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटाच्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता. रोज पहाटे साडेतीनला उठून कात्रज, खेड-शिवापूर करत कल्याण दरवाजामर्गे सिंहगडावर चढून खडकवासला मार्गे सकाळी नऊला दुकानात परत. काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जाऊन परत येत. पुढे रोज सायकलवरून खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम चुकला नाही. पुणे ते कराची सायकलप्रवास करून जद्दनबाई, हुस्नबानू, बेगम पारोचं मनमुराद गाणं ऎकलंय. ते स्वत: तबला वाजवत. गंधर्वांची गाणी तोंडपाठ. हे कळल्यावर नर्गिसच्या आईनं, म्हणजे जद्दनबाईनं, त्यांना कराचीत थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली. सयाजीराव गायकवाडांच्या मदतीनं

१९३६ साली ते बर्लिन ऑलिम्पिक पर्यंत पोहोचले. पायात चप्पल-बूट काहीही न घालता हे ४० मैल पळू शकतात हे पाहोन दस्तुरखुद्द हिटलरनं यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी पास दिला. बडोद्याच्या महाराजांमुळे लंडनलाही गेले. स्वागताला तीन-चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर. पुण्यात पेपर विकणा-या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेनं कसे जमले असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला. उत्तर मिळाले. दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणा-या गव्हर्नरला मराठी-हिंदी आणि क्रॊसकंट्री शिकवायला बाबूराव जात असत.

पर्वती चालत कुणीही चढेल. बाबूराव ’हातावर’ शीर्षासन करत पाय-या चढत. बायकोला पाठुंगळी घेऊन ४३ वेळा पर्वती सर केलीय. क्रॊसकंट्री स्पर्धेचे २५७ बिल्ले जिंकणा-या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध, एक शेर पेढ्याचा खुराक देत. महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात ९० जिलब्यांचं ताट सहज फ़स्त करत. वयाची शंभरी ओलांडल्यावरही रोज १५ पोळ्या रिचवू शकत होते.

तरूण वयात गोखल्यांनी एक धामण, अजगर आणि चित्ता पाळला होता. त्यांच्या समवेत पहुडलेले बाबूराव  हे छायाचित्रही ते पुरावा म्हणून दाखवत. जयंतराव टिळकांबरोबरही त्यांनी शिकारीचा षौक केला. शंतनुराव-यमुताई किर्लोस्करांचे लग्न यांनीच जमवले.

एकशे तीन वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकही औषधाची गोळी घेतली नाही. परवा त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यावर, त्यांना फॅमिली डॉक्टर नसल्यानं, मृत्यूचं सर्टिफ़िकिट आणायचं कुणाचं असा आगळाच प्रश्न त्यांच्यासमवेत राहणा-या त्यांच्या राजश्री-प्रदीप या लेक-जावयाला पडला.

इतरांना जे ’अशक्य’ ते मला ’शक्य’, एवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणा-या या अवलियाचा अस्त परवा झाल्यावर एक चुटपूट लागून राहिली के, आजच्या दृक-श्राव्य माध्यमाच्या जगात, या अविश्वसनीय वाटावे असे विक्रम करणा-या अवलियाला कॆमे-यात पकडून ठेवायला हवं होतं.
--------------------

Thursday, November 25, 2010

उत्स्फ़ूर्तता पुलंची!!!

नमस्कार,

’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.


"तुम्हाला सांगतो..."म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.


मॊरिशसहून परतत होतो. एअरपोर्टच्या ड्यूटी-फ़्री शॉपमध्ये पुल-सुनीताबाईंसमवेत मीही रेंगाळलो होतो. समोरच्या शो-केसमध्ये एक पैशांचं सुंदर लेदर पाकीट लटकवलेलं होतं. पुलंना ते पाकीट फ़ार आवडलं. त्यानी सेल्समनला विचारलं, "केवढ्याला?"
सेल्समननं जी किंमत सांगितली, ती ऎकताक्षणी पुलं क्षणात उद्गारले,
"अरे, मग पाकीटात काय ठेवू?"
------------------

नमनाचा ब्लॉग

नमस्कार,


बोलता बोलता मी आज वयाची ’साठी’ ओलांडली. आणि ’बोलणं’ हाच ’व्यवसाय’ म्हणून स्वीकारण्याची पस्तीशी पार केली. बोलणं आणि बोलकं करणं याचा एक दिवसही कंटाळा आला नाही. किंबहुना ’गप्पां’त रमणं ही मूळचीच आवड असल्यानं भोवताली गप्पिष्टांचं कोंडाळं जमत गेलं. बोलकं करण्याची हौस असल्यानं बोलण्यातून माणसं ’उलगडणं’ हीच दैनंदिनी बनली आणि देशभरच्या तीन हजार माणसांच्या मुलाखती घेण्याचा उच्चांक पार करत त्या माणसांच्या व्यक्तित्वातल्या वैविध्यपूर्ण पैलूंमुळे माझी दैनंदिनी कुठल्याही ’टॉनिक’शिवाय ताजीतवानी राह्यली.


बदलत्या काळाची बदलती शैली स्वीकारत गेल्यानं माणसं जोडण्याचा प्रवाह कायम राह्यला. वर्तमानपत्रं, साप्ताहिक, जाहिराती, रंगमंच, अनुबोधपट, गाणं, ध्वनीमुद्रण, दूरदर्शन, वाहिन्या, टॉक शो अशी माध्यमं हाताळता हाताळता, वयाच्या या टप्प्यावर सध्याच्या माध्यमाला सामोरा जातोय.’ब्लॉग’.


मयुरेश, प्रसाद, योगेश, नितीन, शैलेश या नव्या पीढीतल्या माध्यमातल्या मित्रांच्या सहकार्याने मी आता ’ब्लॉग’द्वारे तुम्हा मंडळींना भेटणार आहे. रोजच्या भटकंतीत भेटलेल्या अनोख्या मुद्रा टिपणार आहे. कधी या पूर्वी भेटलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ आठवणी, दुर्मिळ फ़ोटोंसह नोंदवणार आहे. ताज्या घडामोडींवर जुने संदर्भ जोडत माझी मनची टिप्पण्णी करणार आहे. अनपेक्षितपणे ताजतवाना करणारा अनोखा ’क्षण’ अनुभवला तर तो क्षण तुमच्याबरोबर शेअर करून, तुमच्या चार घटका प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. आधुनिक माध्यमात भेटतोय. काही चुकलं तर ’थेट’ कळवा. म्हणजे आपली परस्परांची ही ’थेट-भेट’ पारदर्शी होईल.
------------------------