Sunday, December 5, 2010

एका अवलियाचा अस्त

पुण्याच्या भरत नाट्य मंदीर जवळच्या पवनमारूती चौकात, टीचभर दुकानात, गेली साठ वर्षं वर्तमानपत्र विकणारे महादेव काशिनाथ गोखले बसलेले दिसत. खाकी अर्धी चड्डी, बिनइस्त्रीचा, जवळजवळ चड्डी झाकणारा, पांढरा ऐसपैस शर्ट, शर्टाला भलामोठा खिसा आणि कॉलरमागे खुंटीला अडकवण्यासाठी 'घोडा'. चेह-यावर ऊन येतंय असं वाटून त्रासलेली मुद्रा. काटक तब्येत. थेट स्पष्ट पुणेरी बोलणं. पेपर विकणारे हे ’बाबूराव’ थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी उलटल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील ,यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण ’शतकाचे साक्षी’ असलेल्या बाबूरावांच्या या अचाट उद्योगांचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अतर्क्य वाटाव्या अशा अफ़ाट गोष्टी करणारा हा ’अवलिया, परवा, वयाच्या १०३ व्या वर्षी निवर्तला.



जन्मभर बाईंडिंग आणि वृत्तपत्रविक्रीत रमलेल्या बाबुरावांना खाण्याचा, पळण्याचा, चालण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटाच्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता. रोज पहाटे साडेतीनला उठून कात्रज, खेड-शिवापूर करत कल्याण दरवाजामर्गे सिंहगडावर चढून खडकवासला मार्गे सकाळी नऊला दुकानात परत. काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जाऊन परत येत. पुढे रोज सायकलवरून खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम चुकला नाही. पुणे ते कराची सायकलप्रवास करून जद्दनबाई, हुस्नबानू, बेगम पारोचं मनमुराद गाणं ऎकलंय. ते स्वत: तबला वाजवत. गंधर्वांची गाणी तोंडपाठ. हे कळल्यावर नर्गिसच्या आईनं, म्हणजे जद्दनबाईनं, त्यांना कराचीत थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली. सयाजीराव गायकवाडांच्या मदतीनं

१९३६ साली ते बर्लिन ऑलिम्पिक पर्यंत पोहोचले. पायात चप्पल-बूट काहीही न घालता हे ४० मैल पळू शकतात हे पाहोन दस्तुरखुद्द हिटलरनं यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी पास दिला. बडोद्याच्या महाराजांमुळे लंडनलाही गेले. स्वागताला तीन-चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर. पुण्यात पेपर विकणा-या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेनं कसे जमले असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला. उत्तर मिळाले. दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणा-या गव्हर्नरला मराठी-हिंदी आणि क्रॊसकंट्री शिकवायला बाबूराव जात असत.

पर्वती चालत कुणीही चढेल. बाबूराव ’हातावर’ शीर्षासन करत पाय-या चढत. बायकोला पाठुंगळी घेऊन ४३ वेळा पर्वती सर केलीय. क्रॊसकंट्री स्पर्धेचे २५७ बिल्ले जिंकणा-या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध, एक शेर पेढ्याचा खुराक देत. महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात ९० जिलब्यांचं ताट सहज फ़स्त करत. वयाची शंभरी ओलांडल्यावरही रोज १५ पोळ्या रिचवू शकत होते.

तरूण वयात गोखल्यांनी एक धामण, अजगर आणि चित्ता पाळला होता. त्यांच्या समवेत पहुडलेले बाबूराव  हे छायाचित्रही ते पुरावा म्हणून दाखवत. जयंतराव टिळकांबरोबरही त्यांनी शिकारीचा षौक केला. शंतनुराव-यमुताई किर्लोस्करांचे लग्न यांनीच जमवले.

एकशे तीन वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकही औषधाची गोळी घेतली नाही. परवा त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यावर, त्यांना फॅमिली डॉक्टर नसल्यानं, मृत्यूचं सर्टिफ़िकिट आणायचं कुणाचं असा आगळाच प्रश्न त्यांच्यासमवेत राहणा-या त्यांच्या राजश्री-प्रदीप या लेक-जावयाला पडला.

इतरांना जे ’अशक्य’ ते मला ’शक्य’, एवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणा-या या अवलियाचा अस्त परवा झाल्यावर एक चुटपूट लागून राहिली के, आजच्या दृक-श्राव्य माध्यमाच्या जगात, या अविश्वसनीय वाटावे असे विक्रम करणा-या अवलियाला कॆमे-यात पकडून ठेवायला हवं होतं.
--------------------